
मुंबईतील प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर (Shree Siddhivinayak Temple) ट्रस्टमध्ये भाजप नेते पवन श्रीपाठी (Pawan Tripathi) यांची खजिनदारपदी नियुक्ती झाल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे.
मराठी एकीकरण समितीने या नियुक्तीला विरोध दर्शवत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या धार्मिक संस्थांमध्ये मराठी प्रतिनिधित्व डावलले जात असल्याचा आरोप केला आहे.
सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट हा राज्यातील सर्वात प्रभावशाली आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या धार्मिक संस्थांपैकी एक मानला जातो. या ट्रस्टकडून मंदिरातील आर्थिक व्यवहार आणि धार्मिक उपक्रमांचे व्यवस्थापन केले जाते. महाराष्ट्र सरकारकडून नुकत्याच ट्रस्टवरील नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
मराठी एकीकरण समितीने या नियुक्ती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राज्यातील सांस्कृतिक आणि धार्मिक संस्थांमध्ये स्थानिक मराठी व्यक्तींना प्राधान्य मिळावे, अशी मागणी केली आहे. महत्त्वाच्या सार्वजनिक संस्थांमध्ये मराठी भाषिकांचे प्रतिनिधित्व कमी होत असल्याची चिंता समितीकडून व्यक्त करण्यात आली.
दुसरीकडे, नियुक्तीचे समर्थन करणाऱ्यांनी प्रादेशिक ओळखीपेक्षा प्रशासनिक क्षमता आणि सार्वजनिक कार्याला महत्त्व दिले पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे सिद्धिविनायक ट्रस्टमधील ही नियुक्ती आता राजकीय आणि सांस्कृतिक चर्चेचा विषय बनली आहे.
हेही वाचा


