
मुंबईतील नाट्यगृह आणि सभागृहांच्या भाड्यात 1 एप्रिलपासून दरवर्षी 5 टक्के वाढ करण्याचा निर्णय पालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) घेतला आहे. या निर्णयाला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून तीव्र विरोध दर्शवण्यात आला आहे.
माहितीनुसार, नाट्यगृहाचे आकारमान आणि आसन क्षमतेनुसार भाडेवाढ लागू होणार. पुढील काळातही दरवर्षी 5 टक्क्यांनी वाढ कायम ठेवली जाणार आहे.
शिवसेनेचे नेते अमेय घोले (Amey Ghole) यांनी याबाबत मनपा आयुक्तांना निवेदन देत हा निर्णय तातडीने स्थगित करण्याची मागणी केली आहे. आपल्या पत्रात त्यांनी नमूद केलं की, या भाडेवाढीमुळे मराठी नाट्य परिषद, निर्माते, कलाकार आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक घटकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
त्यांनी पुढे म्हटलं की, या वाढीमुळे मराठी रंगभूमी, नवोदित कलाकार आणि लहान नाट्यसंस्थांवर आर्थिक ताण पडू शकतो, ज्याचा थेट परिणाम सांस्कृतिक उपक्रमांवर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या निर्णयाचं समर्थन करताना मनपाचे उपआयुक्त अजीत कुमार आंबी यांनी सांगितलं की, सुरुवातीला 10 टक्के वाढ करण्याचा विचार होता. मात्र, परिस्थितीचा विचार करून केवळ 5 टक्के वाढ लागू करण्यात आली. वाढत्या महागाईमुळे हा निर्णय घेण्यात आला असून, कोरोना काळात भाडेवाढ करण्यात आलेली नव्हती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
या निर्णयामुळे मुंबईतील सांस्कृतिक क्षेत्र आणि प्रशासन यांच्यात पुन्हा एकदा मतभेद निर्माण झाले असून, पुढील निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा


