
मुंबईतील कथित बनावट जन्मदाखला घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात येणार आहे. 19 हजार 734 जन्मदाखले बनावट असल्याचे आढळल्याने ते रद्द करण्यात येणार आहेत. यासंदर्भात राज्य सरकारने मुंबई महापालिकेला (BMC) निर्देश दिल्याची माहिती महापौर ऋतु तावडे यांनी बुधवारी दिली.
तावडे यांनी सांगितले की, याशिवाय 20 हजारांहून अधिक जन्मदाखल्यांमध्ये विविध प्रकारच्या त्रुटी आढळल्या आहेत. किरकोळ चुका असलेले दाखले महापालिका स्तरावर रद्द केले जातील. तर गंभीर त्रुटी असलेल्या दाखल्यांबाबत राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील निर्णय घेतला जाईल.
या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाला (SIT) मुंबईतील नोंदवलेल्या चार एफआयआरच्या तपासाबाबत 48 तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महापालिकेच्या प्राथमिक चौकशीत तब्बल 87 हजार 347 संशयास्पद जन्मदाखले जारी करण्यात आल्याचे समोर आले होते. हे दाखले कथितरित्या बांगलादेशी नागरिक आणि रोहिंग्या घुसखोरांना देण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. 2024 ते 2026 दरम्यान SAP प्रणालीद्वारे या नोंदी करण्यात आल्याचे तपासात आढळले.
या प्रकरणात आरोग्य विभागातील चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. देवनार, शिवाजीनगर, मुलुंड आणि कुर्ला पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या घोटाळ्याच्या तपासासाठी SIT स्थापन केली असून संयुक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.
हेही वाचा


