IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये 61 वा सामना लखनऊ सुपर जाएंट्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (LSG VS SRH) यांच्यात पार पडला. लखनऊचं होम ग्राउंड असलेल्या एकना स्टेडियमवर हैदराबादने 6 विकेटने विजय मिळवला. यासह पराभूत झालेली लखनऊ सुपर जाएंट्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा 5 वा संघ ठरला आहे.
सामन्यात हैदराबादने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्याने लखनऊ संघाला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात यावं लागलं. हैदराबाद विरुद्ध फलंदाजी करताना लखनऊकडून सलामी फलंदाज मिचेल मार्श आणि ऍडम मार्करम यांनी 10 ओव्हरमध्ये तब्बल 115 धावांची पार्टनरशिप केली. मात्र त्याचवेळी हर्ष दुबेला 11 व्या ओव्हरला मिचेल मार्शची विकेट घेणं शक्य झालं. त्यानंतर ऋषभ पंत मैदानात आला. परंतु अवघ्या 6 बॉलमध्ये 7 धावा करून तो बाद झाला. त्यानंतर लखनऊकडून निकोलस पुरनने 45 धावांची कामगिरी केली. मात्र त्यानंतर इतर कोणताही फलंदाज मोठ्या धावा करू शकला नाही. लखनऊ सुपर जाएंट्सने 7 विकेट गमावून 205 धावा केल्या. तसेच सनरायजर्स हैदराबादला विजयासाठी 206 धावांचं आव्हान दिलं.
हेही वाचा : ऋषभ पंतच्या पुन्हा गटांगळ्या! मलिंगाने अप्रतिम कॅच घेत दाखवला बाहेरचा रस्ता, पाहून गोएंका उठूनच गेले
सनरायजर्स हैदराबादकडून विजयाचं आव्हान पूर्ण करताना अथर्व तायडेने 13, अभिषेक शर्माने 59, ईशान किशनने 35, हेन्रीचं क्लासेनने नाबाद 47 तर मेंडिसने नाबाद 31 धावा केल्या. लखनऊला हैदराबादच्या केवळ 4 विकेट घेणं शक्य झालं. यात दिव्येश राठीने 2 तर विल्यम ओरुरकेने आणि शार्दूल ठाकूरने प्रत्येकी 1 विकेट घेतली. सनरायजर्स हैदराबादने 6 विकेट्स राखून लखनऊवर विजय मिळवला.