IND vs ENG 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि अखेरचा टेस्ट सामना 31 जुलैपासून लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार शुभमन गिलनं पत्रकार परिषद घेतली आणि अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. बुमराहच्या खेळण्याबाबत सस्पेन्स कायम असून, गंभीर आणि पिच क्युरेटरमधील वाद, तसेच गोलंदाजी संयोजनावर गिलनं खुलासा केला.
बुमराह खेळणार की नाही?
शुभमन गिल म्हणाला, “बुमराह खेळेल की नाही, याचा निर्णय सामना सुरू होण्याआधी घेतला जाईल. पिचवर बरीच गवत आहे आणि हवामानही महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे अंतिम निर्णय सामन्याच्या आधीच घेतला जाईल.”
गंभीर आणि पिच क्युरेटरमध्ये नेमकं काय घडलं?
मंगळवारी ओव्हल मैदानावर गौतम गंभीर आणि पिच क्युरेटर ली फोर्टिस यांच्यात वाद झाला. यावर गिल म्हणाला, “तिथे नेमकं काय झालं हे मला माहिती नाही. क्युरेटरनं काय केलं आणि का केलं, हेही कळालं नाही. आम्ही इथे याआधी 4 सामने खेळलो आहोत, आणि कधीही कुणी अडथळा आणला नाही. कोच आणि कर्णधार अनेकदा पिच पाहायला आले आहेत. मग आता हा वाद का झाला, हे समजत नाही.”
गोलंदाजीचं प्लॅनिंग काय असेल?
बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते, तर पदार्पणात प्रभाव न पाडू शकलेला अंशुल कंबोज बाहेर जाऊ शकतो. गिलनं सांगितलं की अर्शदीप सिंहला तयार राहायला सांगण्यात आलं आहे, पण अंतिम निर्णय पिचच्या स्थितीवर आधारित असेल. इंग्लंडने त्यांच्या टीममध्ये एकही फिरकीपटू घेतलेला नाही. मात्र, गिलला विश्वास आहे की रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर त्यांच्या फिरकीने सामन्यावर प्रभाव टाकू शकतात. सुंदरच्या कामगिरीचं त्यानं विशेष कौतुक केलं.