बदलापुरातील युवा नेत्यांची लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासस्थानी प्रेरणादायी भेट
सामाजिक समतेच्या मूल्यांची जाणीव अधिक ठळक – वरुण म्हात्रे व रोहन पाटील यांचा अनुभव
बदलापूर | प्रतिनिधी – योगेश जनार्दन येलवे
बदलापुरातील युवा नेते वरुण वामन म्हात्रे आणि रोहन पाटील यांनी अलीकडेच लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक निवासस्थानाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांना बाबासाहेबांच्या कार्याची, विचारसरणीची आणि भारताच्या सामाजिक परिवर्तनातील त्यांच्या योगदानाची सखोल जाणीव झाली.

डॉ. आंबेडकर यांनी लंडनमध्ये शिक्षण घेत असताना या वास्तूत वास्तव केले होते. सध्या हे घर भारत सरकारमार्फत संरक्षित असून, भारतीय संविधान निर्मात्याच्या जागतिक वारशाचे प्रतिक म्हणून ओळखले जाते. त्यांचे विचार, संघर्ष आणि सामाजिक समतेसाठी त्यांनी दिलेले योगदान प्रत्यक्ष अनुभवता आले, असे दोन्ही युवा नेत्यांनी सांगितले.
“ही भेट अत्यंत प्रेरणादायी ठरली. बाबासाहेबांनी दिलेल्या सामाजिक समतेच्या मूल्यांची जाणीव आता अधिक ठळक झाली आहे. नव्या पिढीने त्यांच्या विचारातून प्रेरणा घेणं अत्यावश्यक आहे,” असे वरुण म्हात्रे म्हणाले.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ संविधानाचे शिल्पकार नव्हते, तर एक जागतिक दर्जाचे विचारवंत होते. लंडनच्या भूमीवर आजही त्यांचे विचार जसेच्या तसे जपले गेले आहेत, हे पाहून मन अभिमानाने भरून आलं,” असे रोहन पाटील यांनी नमूद केले.
युवकांसाठी ही भेट एक प्रेरणादायी पाऊलवाट ठरेल आणि सामाजिक बांधिलकीच्या मूल्यांना अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास या भेटीतून दोघांनी व्यक्त केला.

✍️ पत्रकार – योगेश जनार्दन येलवे


