बदलापूर – शिवसेनेच्या सौ. सुवर्णा सतीश साटपे यांच्या पुढाकाराने आणि प्रभाग क्रमांक ७ च्या शाखेच्या वतीने, वटपौर्णिमेच्या औचित्याने बदलापूरमध्ये २५० रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमाला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.शिवशांती कॉम्प्लेक्स आणि भवानीशंकर बिल्डिंग परिसरातील वडाच्या झाडाजवळ महिलांनी पारंपरिक विधीने वटवृक्षपूजन केले. या पूजनासाठी आलेल्या प्रत्येक महिलेला एक रोप भेट स्वरूपात देण्यात आले. या उपक्रमाची विशेष बाब म्हणजे मागील आठ वर्षांपासून हा उपक्रम सलगपणे राबवला जात आहे.सौ. सुवर्णा सतीश साटपे म्हणाल्या, “पर्यावरण रक्षण ही केवळ जबाबदारी नसून आपली संस्कृतीदेखील आहे. महिलांनी दरवर्षी वडाची तोडलेली फांदी आणण्याऐवजी झाड लावावे, वाढवावे आणि त्याचीच पुढच्या वर्षी पूजा करावी, हा खरा उद्देश आहे.”
पारंपरिक श्रद्धा व आधुनिक पर्यावरण जागृती यांचा सुंदर संगम या उपक्रमातून साधला गेला. मागील वर्षी वाटप केलेली तुळस महिलांनी घरी लावली होती व ती वाढल्याचा आनंद त्यांनी या वर्षी व्यक्त केला.या उपक्रमाचा हेतू केवळ रोप वाटप नसून, घरोघरी हरित क्रांती पोहोचवणे हा आहे. भविष्यात हा उपक्रम शाळा, महाविद्यालय, वसाहती आणि सामाजिक संस्थांमध्येही राबविण्याचा मानस सौ. सुवर्णा साटपे यांनी व्यक्त केला.