IPL 2025 : आयपीएल 2025 चा शेवटचा लीग स्टेज सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात पार पडला. या सामन्यात आरसीबीने लखनऊचा पराभव केला असून 6 विकेटसने सामना जिंकला आहे. यासहा आरसीबी पॉईंट्स टेबलमध्ये टॉप 2 मध्ये पोहोचली असून क्वालिफायर 1 चा सामना खेळण्यासाठी पात्र ठरली आहे.
आयपीएल 2025 मधील 70 वा लीग स्टेज सामना लखनऊ सुपर जाएंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स यांच्यात खेळवण्यात आला. लखनऊचं होम ग्राउंड असलेल्या एकना स्टेडियमवर हा सामना पार पडला असून यात आरसीबीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे लखनऊला फलंदाजीसाठी उतरावे लागेल. लखनऊकडून फलंदाजी करताना त्यांचा कर्णधार ऋषभ पंत याने सर्वाधिक 118 धावांची कामगिरी केली. त्याने 55 बॉलमध्ये 100 धावा करून शतक पूर्ण केलं. ऋषभचं आयपीएलमधील हे दुसरं शतक ठरलं. लखनऊच्या फलंदाजांनी 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 227 धावांची कामगिरी केली. लखनऊच्या संघाने आरसीबीला विजयासाठी 228 धावांचे आव्हान दिले आहे.
आरसीबीकडून विजयाचं आव्हान पूर्ण करण्यासाठी विराट कोहली आणि फिलिप सॉल्ट आले. त्यावेळी विराट कोहलीने 54 धावा ठोकून अर्धशतक पूर्ण केले. फिलिप सॉल्टने 30, रजत पाटीदारने 14, मयंक अग्रवालने 41, जितेश शर्माने 85 धावा केल्या. आरसीबीने विजयाचं आव्हान 6 विकेट राखून पूर्ण केले. आरसीबी आता पॉईंट्स टेबलमध्ये टॉप 2 वर पोहोचली असून ती पंजाब किंग्स सोबत 29 मे रोजी क्वालिफायर 1 सामना खेळेल.
प्लेऑफ सामन्यांचं वेळापत्रक :
क्वालिफायर 1 – 29 मे
एलिमिनेटर – 30 मे
क्वालिफायर 2 – 1 जून
अंतिम सामना – 3 जून