Wednesday, July 30, 2025
HomeCityNewsBadlapurTimes | गावदेवी परिसरातील नागरिकांचा गंभीर सवाल : मच्छीमार्केट ते रेल्वे स्टेशन...

BadlapurTimes | गावदेवी परिसरातील नागरिकांचा गंभीर सवाल : मच्छीमार्केट ते रेल्वे स्टेशन रस्ता असुरक्षित, अस्वच्छतेचा कडेलोट

बदलापूर, प्रतिनिधी |

बदलापूर शहरातील गावदेवी परिसर हा एकीकडे मंदिर, तलाव आणि सुंदर बागांसह संस्कृतीची ओळख असलेला परिसर मानला जातो. मात्र दुसरीकडे, याच परिसरातील रेल्वे स्थानक ते मच्छीमार्केटपर्यंतचा समांतर रस्ता सध्या अस्वच्छता, बेकायदेशीर फेरीवाले, नशेखोर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे धोकादायक ठरत आहे. या रस्त्याचा वापर रोज हजारो नागरिक करतात, विशेषतः गावदेवी परिसरातील महिला, विद्यार्थी आणि वृद्ध.

या समस्यांविरोधात आवाज उठवत जागरूक नागरिक अवधूत चव्हाण यांनी प्रशासनाच्या नावाने एक निवेदन सादर करत गंभीर प्रश्न मांडले आहेत. त्यांच्या मते, कुबनप यांनी मच्छीमार्केटसाठी बांधून दिलेल्या इमारतीत जागा असतानाही अनेक विक्रेते सरळ रस्त्यावर मटण, चिकन आणि मासळी विक्री करत आहेत. परिणामी, रस्ता अरुंद होतो, वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आणि दुर्गंधीमुळे येण्या-जाण्याचा त्रास सहन करावा लागतो.

सार्वजनिक ठिकाणी गुन्हेगारी वर्तन वाढतेय

या भागात अनेक वेळा दारू पिणारे, गांजाचं सेवन करणारे, गुंड प्रवृत्तीचे युवक संध्याकाळी गटागटात जमून उभे राहतात. महिला आणि मुलींना या रस्त्यावरून एकटं जाणं धोकादायक वाटू लागलं आहे. छेडछाडीच्या, चोरीच्या घटना घडण्याची शक्यता असून, त्यामुळे महिलांना आपला मार्ग बदलावा लागतो किंवा ट्रेनमधून उतरल्यावर थेट रिक्षा घेऊन घरी जावं लागतं.

अपूर्ण रेल्वे भिंत बनली धोक्याची सावली

रेल्वे प्रशासनाने मच्छीमार्केटलगतच्या भागात संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू केले होते, परंतु ती अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे ही अर्धवट भिंत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना लपण्यासाठी आदर्श ठिकाण बनली आहे. संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळेस या भिंतीच्या मागे लपून दारू व गांजाचे सेवन, चोरीची पूर्वतयारी इत्यादी सगळं निर्भयपणे सुरू असतं.

बेकायदेशीर पार्किंगमुळे रस्ता बंद

या रस्त्यावर बेकायदेशीरपणे दोन चाकी वाहनांची पार्किंग मोठ्या प्रमाणावर केली जाते. परिणामी, वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो. या गोष्टीकडे स्थानिक RTO प्रशासनाने अजूनही पुरेशी दखल घेतलेली नाही, अशीही तक्रार आहे. वाहनधारक बिनधास्तपणे रस्ता अडवून आपली वाहने लावतात, जे कायद्याचे उल्लंघनच आहे.

गावदेवी परिसराची ओळख धोक्यात

गावदेवी परिसरात गावदेवी मंदिर, सप्तश्रृंगी मंदिर, विनायकेश्वर शिवमंदिर, तलाव, बाग अशा सांस्कृतिक व धार्मिक स्थळांची रेलचेल आहे. येथील वातावरण शांत, नैसर्गिक आणि आध्यात्मिक वाटते. परंतु मच्छीमार्केटचा रस्ता आणि त्याच्या आजूबाजूचा बकालपणा, असुरक्षितता, अस्वच्छता ही या सर्व वातावरणावर काळोख पसरवते आहे. लोकांना इथून जाणं म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखं वाटतं.

प्रशासनाकडे ठाम मागणी

अवधूत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे विनंती केली आहे की –

  1. मच्छीमार्केटमध्ये दिलेल्या इमारतीमध्ये विक्रेत्यांना बसण्यास भाग पाडावे.
  2. बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कारवाई करावी.
  3. रेल्वे भिंतीचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करून सुरक्षेची खात्री द्यावी.
  4. दारू व गांजाच्या सेवनावर कडक कारवाई करण्यात यावी.
  5. रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्यांवर RTO प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी.
  6. स्थानिक पोलीस गस्त वाढवून गुन्हेगारी प्रवृत्तीला रोखावे.

गावदेवी परिसरातील नागरी समस्या आता फार काळ दुर्लक्षित करता येणार नाहीत. प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास या भागातील रहिवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. या रस्त्याचे पुनरुज्जीवन करणे आणि स्थानिक जनतेला त्यांच्या दैनंदिन प्रवासात सुरक्षितता देणे हे आता अत्यावश्यक झाले आहे.

– बदलापूर प्रतिनिधी, गावदेवी

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com