बदलापूर | प्रतिनिधी
बदलापूर पूर्व येथील विवेकानंद नगर परिसरात राहणाऱ्या केवळ नऊ वर्षीय रितिका संदेश करोचीया हिचा कुत्र्याच्या चाव्यामुळे मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, भटक्या कुत्र्यांच्या समस्येचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
काय घडलं नेमकं?
४ मे २०२५ रोजी, रितिका आपल्या घराजवळ खेळत असताना एका भटक्या कुत्र्याने तिच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर चावा घेतला होता. त्वरित पालिकेच्या दवाखान्यात तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले व रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन देण्यात आले. घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यावेळी डॉक्टरांनी अधिक काही चिंता नसल्याचे सांगितले होते.
मात्र, काही दिवसांनी रितिकाच्या घशात तीव्र वेदना आणि श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. दोन दिवसांपूर्वी तिची प्रकृती अचानक खालावल्याने तिला स्थानिक दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी प्रकृती गंभीर असल्याचे सांगून तिला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले. दुर्दैवाने उपचारादरम्यान रितिकाचा मृत्यू झाला.
करोचीया कुटुंबावर दुःखाचा डोंगर
केवळ नऊ वर्षांची चिमुरडी, अभ्यासात हुशार आणि हसतमुख स्वभावाची रितिका, अचानक असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने करोचीया कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातील रहिवासी, शेजारी आणि तिच्या शाळेतील मित्रमैत्रिणींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर
रितिकाच्या मृत्यूनंतर नागरिकांत तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे. अनेक नागरिकांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून बदलापूर शहरात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. रात्रीच्या वेळेस शहरातील रस्त्यांवर कुत्र्यांचे कळप फिरताना दिसतात. दुचाकीस्वारांना पाठलाग करून घाबरवणे, पादचाऱ्यांना चावणे, शाळकरी मुलांना त्रास देणे असे प्रकार वारंवार घडत आहेत.
अपघातांचीही वाढती संख्या
फक्त चावण्यापुरतेच नव्हे, तर भटक्या कुत्र्यांच्या पाठलागामुळे अनेक अपघातही घडले आहेत. काही महिन्यांपूर्वी एका दुचाकीस्वाराचा गडगडून अपघात झाला होता, जेव्हा अचानक समोर कुत्र्यांचा कळप आला आणि वाहनाचा तोल गेला. अशा घटनांबाबत पालिकेला अनेक वेळा तक्रारी देण्यात आल्या आहेत, मात्र अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही.
पालिकेवर नागरिकांची टीका
नागरिकांनी ठणकावून सांगितले की, अनेक वेळा पालिकेच्या जनारोग्य विभागाकडे आणि मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रारी देऊनही केवळ आश्वासन दिले जाते. प्रत्यक्षात भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही. “एवढ्या मोठ्या शहरात जर लहान मुलांचे प्राणही वाचवता येत नसतील, तर पालिकेचा उपयोग तरी काय?” असा संतप्त सवाल एका स्थानिक नागरिकाने उपस्थित केला.
मागण्या आणि उपाययोजना
रितिकाच्या मृत्यूनंतर शहरातील अनेक सामाजिक संघटना, पालक वर्ग आणि नागरिकांनी एकत्र येऊन पालिकेकडे खालील मागण्या मांडल्या आहेत:
- भटक्या कुत्र्यांचे निर्बंध लावण्याची तात्काळ कार्यवाही.
- रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम अधिक प्रभावी करणे.
- शाळा, सोसायटी परिसरात कुत्रे आढळल्यास त्वरित पकडण्याची यंत्रणा.
- प्रत्येक घटनेचा स्वतंत्र अहवाल तयार करून कारवाई.
प्रशासनाचे उत्तर अपेक्षित
संपूर्ण घटनेनंतर पालिकेने कोणतेही अधिकृत निवेदन दिलेले नाही. मात्र स्थानिक नगरसेवक आणि काही सामाजिक कार्यकर्ते यांनी रुग्णालयात जाऊन कुटुंबियांची भेट घेतली असून, पालिकेवर दबाव टाकण्याची तयारी दर्शवली आहे.
रितिकाचा दुर्दैवी मृत्यू केवळ एका चिमुकल्याचे आयुष्य हिरावून गेला नाही, तर शहराच्या व्यवस्थेतील गंभीर उणीवा देखील समोर आणून ठेवतो. आता तरी प्रशासन जागे होईल का? की आणखी एखादी अशी घटना घडावी लागेल?
– बदलापूर टाईम्स
(नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव जागरूक)