Thursday, May 1, 2025
HomeCityNewsBadlapurCity | प्लॅटफॉर्म क्रमांक एक बंद! प्रवाशांचे हाल, खासदार बाळ्या मामा म्हात्रे...

BadlapurCity | प्लॅटफॉर्म क्रमांक एक बंद! प्रवाशांचे हाल, खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांचा इशारा!

बदलापूर : बदलापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एक सध्या प्रवाशांसाठी बंद ठेवण्यात आले असून, त्याठिकाणी लोखंडी संरक्षक जाळी लावण्यात आली आहे. या बंदीमुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत असून, संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. प्रवाशांच्या या त्रासाची गंभीर दखल घेत खासदार सुरेश ऊर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी थेट रेल्वे स्थानकाला भेट देत पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

खासदार म्हात्रे यांनी रेल्वे प्रशासनाला थेट इशारा दिला की, प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरील लिफ्ट आणि एस्केलेटरचे काम पूर्ण झाल्यानंतर जर प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील लोखंडी जाळी काढण्यात आली नाही, तर आपण स्वतः ती जाळी काढून टाकू. सध्याचे काम दीड महिन्यांत पूर्ण होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले असून, तोपर्यंत प्रवाशांनी संयम बाळगावा असेही म्हात्रे यांनी सांगितले.

अचानकचा निर्णय, माहितीशिवाय अंमलबजावणी

प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर संरक्षक जाळी उभारण्यात आली त्याबाबत ना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली, ना स्थानकावर फलक लावण्यात आले, ना उदघोषणा करण्यात आली. प्रवाशांना कोणतीही कल्पना न देता हे पाऊल उचलण्यात आले, हे सरळसरळ दादागिरीचं उदाहरण आहे, असा सवाल बाळ्या मामा यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. “माझ्यासारख्या खासदारालाही याबाबत पत्र देण्यात आले नाही,” असे म्हणत त्यांनी प्रशासनाच्या कामशैलीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

प्रवाशांची वाढती फरफट

पूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि एक अ या दोन्ही प्लॅटफॉर्मवर प्रवासी गर्दी विभागली जात होती. त्यामुळे कोणतीही ट्रेन आली तरी चढणं-सरणं तुलनेत सोप्पं व्हायचं. परंतु, सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक बंद झाल्यामुळे सर्व भार प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर येऊन पडत आहे. त्यामुळे एका लोकलला उशीर झाला, की संपूर्ण व्यवस्थेचा गोंधळ उडतो आहे.

कर्जत, खोपोली परिसरात राहणारे अनेक प्रवासी मुंबईहून बदलापूरपर्यंत लोकलने येतात. हे प्रवासी पूर्वी प्लॅटफॉर्म एकवर उतरून सरळ दोनवर जाऊन पुढच्या गाडीत बसू शकत होते. पण आता त्यांना जिना चढून-उतरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जावे लागत असल्याने त्रास होतो आहे. वृद्ध, महिला, शाळकरी मुले आणि शारीरिकदृष्ट्या असमर्थ व्यक्तींना तर याचा विशेष त्रास होत आहे.

काम चालू, पण प्रवाशांच्या भावनांचा आदर हवाच

खासदार म्हात्रे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश संघटक सचिव हेमंत रुमणे, शिवसेना शहरप्रमुख किशोर पाटील, काँग्रेसचे लक्ष्मण कुडव, असगर खान आणि इतर महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा निषेध केला. काम सुरु असले तरी प्रवाशांच्या सोयीसाठी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक होते, असे मत सर्वांनी मांडले.

खासदार म्हात्रे यांनी आरपीएफ कार्यालयात अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करत कामाची सद्यस्थिती जाणून घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, “काम सुरु असल्यामुळे काही अडचणी येणं साहजिक आहे. मात्र, प्रशासनाने याचा योग्य पद्धतीने प्रचार-प्रसार करणे गरजेचे होते. थेट जाळी बसवणे आणि प्लॅटफॉर्म बंद करणे हा अन्याय आहे.”

सार्वजनिक भावना आणि व्यवस्थापन

प्रत्येक दिवसाला हजारो प्रवासी बदलापूर स्थानकात ये-जा करतात. अशावेळी प्लॅटफॉर्मचा एक भाग बंद करणं म्हणजे बाकीच्या प्लॅटफॉर्मवरचा ताण वाढवणं होय. एकही ट्रेन जर उशिराने आली तर संपूर्ण व्यवस्थेचा ढासळलेला चेहरा समोर येतो. प्रवाशांच्या भावनांचा विचार करूनच प्रशासनाने निर्णय घेणे गरजेचे असल्याचे म्हात्रे यांनी अधोरेखित केले.

प्रवाशांची मागणी – कामात गती आणा

बदलापूरकर प्रवाशांची स्पष्ट मागणी आहे की, प्रशासनाने कामात गती आणावी आणि किमान दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. एस्केलेटर आणि लिफ्ट हे अत्यंत आवश्यक घटक असून, त्याचे काम जलदगतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. अन्यथा लोकांचा संयम सुटू शकतो, अशी भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे.

शेवटी काय अपेक्षित?

सध्या दीड महिना प्लॅटफॉर्म क्रमांक एक बंद राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्या काळात काम पूर्ण करून, लवकरात लवकर लोखंडी संरक्षक जाळी काढावी, ही प्रवाशांची प्रमुख मागणी आहे. यासोबतच भविष्यात अशा प्रकारच्या निर्णयांपूर्वी प्रवाशांना सूचित करण्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, अशीही अपेक्षा आहे.

रेल्वे प्रशासनाने जर वेळेत योग्य निर्णय घेतला नाही, तर प्रवाशांचा संताप तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व स्तरातून आता एकच आवाज उठतोय – “प्रवाशांची सोय आणि सुरक्षितताच प्राधान्य!”


लेखक – सागर कदम
सहलेखक – किरण भालेराव, करिना शाह
छायाचित्र सौजन्य – पत्रकारांची टीम | Badlapur Times

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments