आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याची काळजी घेणे अधिक कठीण झाले आहे. एकदा का एखादी आजारपणाची तक्रार झाली, की डॉक्टरांकडून उपचार सुरू होतो आणि औषधांची यादी हातात येते. मात्र या औषधांचा योग्य वापर, वेळेवर सेवन, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चालणं – म्हणजेच औषध व्यवस्थापन (Medication Management) – हे आरोग्य पुनर्प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते.
औषधांचे वेळेवर आणि योग्य प्रमाणात सेवन का गरजेचे?
डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचे योग्य प्रमाणात, योग्य वेळेला आणि ठरलेल्या कालावधीपर्यंत सेवन केल्यास त्याचा शरीरावर चांगला परिणाम होतो. औषधांचा हेतू रोग बरा करणे, त्रास कमी करणे किंवा आजार नियंत्रणात ठेवणे हा असतो. जर औषध वेळेवर घेतले गेले नाहीत, तर त्यांचा प्रभाव कमी होतो, आणि बरेचदा आजार बळावतो किंवा दीर्घकालीन नुकसान होते.
उदाहरणार्थ, उच्च रक्तदाबासाठी दिलेली औषधे जर वेळेवर घेतली गेली नाहीत, तर रक्तदाब अनियंत्रित होऊ शकतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
औषधांचे संभाव्य दुष्परिणाम – सावध राहणे गरजेचे
प्रत्येक औषधाचे काही ना काही दुष्परिणाम (Side Effects) असू शकतात. जसे की थकवा, चक्कर येणे, अपचन, उलट्या, झोप न लागणे, किंवा त्वचेवर पुरळ येणे इत्यादी. हे परिणाम हलके ते तीव्र स्वरूपाचे असू शकतात. बरेच वेळा रुग्ण हे दुष्परिणाम लक्षात घेत नाहीत किंवा डॉक्टरांशी शेअर करत नाहीत, त्यामुळे औषध बदलण्याची संधी गमावली जाते.
काही वेळा दोन वेगवेगळ्या आजारासाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांमध्ये प्रतिक्रिया होऊ शकते. म्हणूनच कोणतेही नवीन औषध सुरु करण्यापूर्वी आपल्या नियमित औषधांची माहिती डॉक्टरांना देणे खूप आवश्यक आहे.
डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील स्पष्ट संवाद
औषध व्यवस्थापन यशस्वी होण्यासाठी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात खुला आणि विश्वासू संवाद असणे आवश्यक आहे. रुग्णांनी डॉक्टरांना आपले लक्षणे, आधीची औषधे, अॅलर्जी, किंवा आयुर्वेदिक औषध वापर यासारखी माहिती स्पष्टपणे सांगणे गरजेचे आहे.
यासोबतच, डॉक्टरांनीही औषधांचे कारण, डोस, सेवनाची वेळ, शक्य दुष्परिणाम इ. विषयी सविस्तर माहिती देणे गरजेचे आहे. यामुळे रुग्ण अधिक जबाबदारीने औषधे घेऊ शकतो.
औषध व्यवस्थापनासाठी काही उपयुक्त टिप्स
- औषधांची यादी तयार ठेवा – घरात कोणती औषधे आहेत, ती कोणासाठी आहेत, डोस किती आहे याची स्पष्ट यादी ठेवा.
- अलार्म लावा किंवा मोबाइल रिमाइंडर वापरा – वेळेवर औषध घेण्यासाठी.
- औषधे संपण्यापूर्वीच पुन्हा मागवा – विशेषतः क्रॉनिक आजारांमध्ये नियमित औषध घेणे आवश्यक असते.
- औषधं कधीच स्वखुशीने थांबवू नका – डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध बंद करणे धोकादायक ठरू शकते.
- फार्मासिस्टचा सल्ला घ्या – औषधांबद्दल शंका असल्यास, जवळच्या फार्मासिस्टशी चर्चा करा.
- लेबल वाचा – औषधाच्या पॅकेटवरील सूचना नेहमी वाचा, विशेषतः expiration date आणि सेवनाचे नियम.
वृद्धांसाठी औषध व्यवस्थापन अधिक महत्त्वाचे
वृद्ध व्यक्तींमध्ये अनेक वेळा एकाच वेळी अनेक औषधे घेतली जातात (Polypharmacy). त्यामुळे विसरणे, चुकीचा डोस घेणे किंवा चुकीच्या वेळी औषध घेणे ही समस्या उद्भवू शकते. त्यामुळे घरातील लोकांनी किंवा केअरगिव्हर्सनी वृद्ध रुग्णांसाठी औषध व्यवस्थापनाची जबाबदारी घेणे गरजेचे ठरते.
तंत्रज्ञानाचा वापर करा
आजकाल अनेक मोबाईल अॅप्स उपलब्ध आहेत जे औषधांची नोंद ठेवण्यास, वेळेवर स्मरण करून देण्यास मदत करतात. तसेच डिजिटल मेडिकल फाइल्स, रेकॉर्ड्स यामार्फत औषधांची माहिती सुरक्षित ठेवता येते.
औषध व्यवस्थापन ही एक आरोग्याशी निगडित जबाबदारी आहे. वेळेवर औषध घेणे, डॉक्टरांचा सल्ला घेणे, दुष्परिणाम लक्षात घेणे आणि संवाद साधणे – या गोष्टींचा योग्य समन्वय केल्यास उपचार यशस्वी ठरतात. आपले आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी औषधांबाबतची सजगता आणि शिस्त हीच खरी औषध आहे.
लेखिका : करिना शहा