Thursday, July 10, 2025
HomeCityNewsBadlapurcity | पोलीस बंदोबस्त व दंगानियंत्रण तुकड्या तैनात

Badlapurcity | पोलीस बंदोबस्त व दंगानियंत्रण तुकड्या तैनात

बदलापूर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र. १ बंद – प्रवाशांचे हाल, प्रशासनाच्या भूमिकेवर संताप!

बदलापूर, २१ एप्रिल २०२५ (प्रतिनिधी) – मध्य रेल्वेच्या बदलापूर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ अचानक बंद केल्यामुळे हजारो लोकल प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासात अडथळे निर्माण झाले असून, या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने प्लॅटफॉर्मवर रेलिंग टाकून पूर्णपणे प्रवेशबंदी केल्यामुळे आता केवळ होम प्लॅटफॉर्मवरच सर्व गाड्या थांबणार आहेत.

दररोज हजारो प्रवासी बदलापूर स्थानकातून मुंबईकडे कार्यालयीन कामानिमित्त प्रवास करतात. बदलापूर शहरातील रहिवासी, विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक जण प्लॅटफॉर्म क्रमांक १ वापरत होते. परंतु पुलाच्या दुरुस्तीचे कारण सांगून प्रशासनाने तो कायमस्वरूपी बंद केला आहे. परिणामी होम प्लॅटफॉर्मवर अतीगर्दी वाढली असून चेंगराचेंगरीची भीती व्यक्त केली जात आहे.

IMG 0055 IMG 0056

प्लॅटफॉर्म १ बंद, पण १A खुला

महत्त्वाचं म्हणजे बदलापूर स्थानकावरील प्लॅटफॉर्म १A सध्या प्रवाशांसाठी खुला आहे. स्थानकाच्या उत्तर बाजूला असलेला हा प्लॅटफॉर्म मुख्यत्वे शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) लोकलसाठी वापरला जातो. परंतु त्याकडे फार कमी लोकांचा ओढा असल्याने त्याचा उपयोग पूर्ण क्षमतेने होत नाही. प्रशासनाने याचा समतोल वापर करणे अपेक्षित आहे.

प्रवाशांचा संताप : “दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?”

प्लॅटफॉर्म क्रमांक १ बंद केल्यामुळे संपूर्ण गर्दी आता होम प्लॅटफॉर्मवर येऊन पडली आहे. यामुळे पादचारी पुलावर तसेच प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्यांना अपघाताची शक्यता वाढली आहे. अनेक स्थानिकांनी रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयावर टीका करत म्हणाले, “जर उद्या काही अनर्थ झाला, चेंगराचेंगरी झाली, तर त्याला जबाबदार कोण?”

स्थानिक खासदारांची निष्क्रियता?

या प्रकरणात रेल्वे प्रशासनाने स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतल्याचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये खासदार आणि आमदारांबद्दल रोष व्यक्त केला जात आहे. स्थानिक खासदार बाल्या मामा यांच्या निष्क्रियतेवर सोशल मिडीयावर टीकेची झोड उठली आहे. त्यांच्या हस्तक्षेपाशिवाय असा निर्णय घेणे चुकीचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

पोलीस बंदोबस्त व दंगानियंत्रण तुकड्या तैनात

आज २१ एप्रिल रोजी सकाळपासून बदलापूर स्थानकावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून दंगानियंत्रण पथक देखील स्टेशन परिसरात दाखल झाले आहे. प्रशासनाला स्थानिकांचा रोष समजल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही तैनाती करण्यात आली आहे. काही प्रवासी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

प्रशासनाची भूमिका अस्पष्ट

रेल्वे प्रशासनाच्या दृष्टीने पुला खालील काम सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गरजेचे असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु हे काम सुरू करण्याआधी प्रवाशांना पर्याय दिला गेला नाही, ही बाब गंभीर आहे. प्लॅटफॉर्म पूर्णपणे बंद न करता अंशतः वापरासाठी खुला ठेवता आला असता, अशी मागणी आता प्रवासी संघटनांकडून होऊ लागली आहे.

प्रवाशांची अडचण – महिला, विद्यार्थी, दिव्यांग प्रवाशांना त्रास

गर्दीच्या वेळी होम प्लॅटफॉर्मवर स्थान मिळवणे अवघड होऊन बसते. त्यामुळे महिला, विद्यार्थी व दिव्यांग प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांनी दुसऱ्या स्थानकांवरून चढणे पसंत केले आहे. काहींनी आपल्या नोकर्‍या, शाळा-कोलेजच्या वेळा बदलल्या आहेत.

यंत्रणांची एकतर्फी कारवाई

प्लॅटफॉर्म क्रमांक १ च्या बंदीबाबत प्रवासी संघटनांना विश्वासात न घेता निर्णय घेण्यात आल्याचा आरोप होत आहे. मागील अनेक वर्षांपासून बंदीची गरज असल्याचे सांगितले जात असले तरी आजवर कोणतीही उपाययोजना राबवण्यात आली नव्हती. मग अचानक हे काम का आणि का आता? असा थेट सवाल आता केला जातो आहे.

यंत्रणांना काय करावे लागेल?

  • प्लॅटफॉर्म १A चा अधिकाधिक उपयोग करून गर्दीचे व्यवस्थापन करणे
  • होम प्लॅटफॉर्मवरची सुरक्षा वाढवणे
  • नवीन पादचारी पूल किंवा सबवेचा विचार करणे
  • प्रवाशांशी खुले संवाद साधून निर्णयांची माहिती देणे

शेवटी…

बदलापूरसारख्या जलदगतीने वाढणाऱ्या शहरात रेल्वे व्यवस्थापन हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रशासनाने वेळेत शहाणपण दाखवले नाही, तर उद्या मोठी दुर्घटना घडू शकते. याप्रकरणी तात्काळ योग्य उपाययोजना करणे, आणि प्लॅटफॉर्म १ चे पर्यायी व्यवस्थापन उभे करणे ही काळाची गरज आहे.

लेखक: सागर कदम | सहलेखक: किरण भालेराव

तारीख: २१ एप्रिल २०२५

बदलापूर LIVE | www.badlapur.co.in

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com